






महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था
निसर्गाचे संवर्धन, शिक्षण व त्या विषयीची जनजागृती हे हेतू डोळ्यांपुढे ठेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (मुंमप्रविप्रा) ने पुढाकार घेऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची निर्मिती केली. आज निसर्ग उद्यान या परिसरातून फेरफटका मारला असता सर्वच हेतू संपूर्णपणे सफल झाल्याचे दिसून येते.
मुंबई शहराच्या एकेकाळच्या क्षेपण भूमी वर तयार करण्यात आलेले निसर्ग उद्यान म्हणजे मानवनिर्मित जंगलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ह्या मानव निर्मित जंगलालाच जोडून माहीमच्या खाडीतील (मिठी नदीच्या पात्रातील) तिवराची नैसर्गिक जंगले आहेत.
नैसर्गिक संपदेचा वारसा टिकवून ठेवणे व त्याची (त्या सोबतच्या सर्वच प्रकारच्या जैविक संपदेसह) संवर्धन करणे ह्या हेतुने साकारलेल्या ह्या निसर्ग उद्यानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपण मुंबईसारख्या गच्च दाटीवाटीच्या शहराच्या मध्यभागी आहोत ह्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो. नियमितपणे पुन्हा पुन्हा येत राहणाऱ्या प्रेक्षकांची वाढती संख्या हेच सुचवते कि, जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि निसर्गाचे नियम सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी निसर्ग उद्यानासारखे उत्तम स्थळ नाही.