- info@maharashtranaturepark.org
- कार्यालय +९१-९८१९०२६३०७
- रोपवाटीका +९१-९८१९०२६३०8
आमच्याबद्दल
निसर्गाचे संवर्धन, शिक्षण व त्या विषयीची जनजागृती हे हेतू डोळ्यांपुढे ठेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (मुंमप्रविप्रा) ने पुढाकार घेऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची निर्मिती केली. आज निसर्ग उद्यान या परिसरातून फेरफटका मारला असता सर्वच हेतू संपूर्णपणे सफल झाल्याचे दिसून येते.
मुंबई शहराच्या एकेकाळच्या क्षेपण भूमी वर तयार करण्यात आलेले निसर्ग उद्यान म्हणजे मानवनिर्मित जंगलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ह्या मानव निर्मित जंगलालाच जोडून माहीमच्या खाडीतील (मिठी नदीच्या पात्रातील) तिवराची नैसर्गिक जंगले आहेत.
नैसर्गिक संपदेचा वारसा टिकवून ठेवणे व त्याची (त्या सोबतच्या सर्वच प्रकारच्या जैविक संपदेसह) संवर्धन करणे ह्या हेतुने साकारलेल्या ह्या निसर्ग उद्यानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपण मुंबईसारख्या गच्च दाटीवाटीच्या शहराच्या मध्यभागी आहोत ह्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो. नियमितपणे पुन्हा पुन्हा येत राहणाऱ्या प्रेक्षकांची वाढती संख्या हेच सुचवते कि, जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि निसर्गाचे नियम सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी निसर्ग उद्यानासारखे उत्तम स्थळ नाही.
महारष्ट्र निसर्ग उय्द्यानाचा इतिहास
सन १९७७ च्या दशकाच्या अखेरीस महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची धारावीमधील ही ३७ एकर जमीन केवळ एक गलिच्छ कचरा क्षेपण क्षेत्र होती.
मार्च, १९७७ मध्ये महाराष्ट्र शासनाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) च्या विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली होती.
जून, १९७७ मध्ये मुंमप्रवि प्राधिकरणाने बीकेसीचे नियोजन प्रस्ताव प्रकाशित केले तसेच त्यासाठी सूचना व आपत्ती आमंत्रित केल्या होत्या.
मुंमप्रवि प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या नियोजन प्रस्तावासंदर्भात सूचना देण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एफ – भारत ने मुंमप्रविप्रा यांच्याशी संपर्क साधून त्यांना बीकेसी मधील ‘एच’ ब्लॉक हा महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या निर्मितीसाठी आरक्षित ठेवावा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे बीकेसीच्या नियोजन प्रस्तावामध्ये ह्या ३७ एकर क्षेत्राचा समावेश करून तो महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला व त्यास महाराष्ट्र शासनाने १९७९ साली परवानगी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या नागरी विभागाने सप्टेंबर, १९७९ साली मुंमप्रवि प्राधिकरण यांच्या अधिपत्त्याखाली महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या विकासासाठी एक प्रकल्प गट स्थापन केला व त्यांना ३७ एकर जागेचा विस्तृत अभ्यास करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे प्रकल्प गटाने विस्तृत अभ्यास करून प्रकल्पाचा अहवाल जून, १९८२ मध्ये शासनाकडे सादर केला.
महाराष्ट्र शासनाने सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुंमप्रवि प्राधिकरणावर सोपवली आणि प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अनुदान राज्य सरकारकडून मुंमप्रवि प्राधिकरण यांना देण्यात यावे अशी तरतूद शासनाच्या अर्थसंकल्पात केली.
सन १९८२ – १९८३ मध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या विकासाची कामे मुंमप्रवि प्राधिकरणाने हाती घेतली. मुंमप्रवि प्राधिकरणाच्या विनंतीनंतर जागा साफ करण्यापासून ते झाडे लावण्याचे काम डब्ल्यू डब्ल्यू एफ – भारत यांच्याकडे सोपविण्यात आली. सन १९८३ साली डॉ. सलीम अली यांच्या हस्ते पहिले सदाहरित झाड उद्यानात लावण्यात आले. त्यानंतर झाडे लावण्याच्या मोहिमेत मुलांना विशेषतः शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनासामावून घेतले.
जून, १९८४ मध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानामध्ये शैक्षणिक इमारत केंद्राचे काम मुंमप्रवि प्राधिकरणाने हाती घेतले.
सन १९८७ मध्ये पुन्हा डॉ. सलीम अली यांनी पाच स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण केले. त्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, पळस आणि आंबा या जातींचा समावेश आहे.
उद्यानामध्ये दोन मुख्य विभाग आहेत:
- वृक्षाच्छादित क्षेत्र
- शैक्षणिक केंद्र- जेथे मुंबई शहर व उपनगरामधील शाळा/ महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थीनींना निसर्ग संवर्धन, शिक्षण व जनजागृती याबद्दल माहिती दिली जाते.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या, १६ मार्चच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि यासभोवतालचा १८० हेक्टरचा परिसर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या अंतर्गत ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित करण्यात आला.त्यानंतर उद्यानात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या, जसे की शैक्षणिक केंद्र, निसर्ग फेरीची पायवाट, उद्यानाच्या चारही बाजूला कुंपण, जलाशय आणि रोपवाटिका.
दि. २२ एप्रिल, १९९४ ‘वसुंधरा’ दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र निसर्गाचे उद्घाटन डॉ. प. अलेक्झांडर, राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कचरा क्षेपण भूमीचे नियोजन करणे हा आजच्या काळात मोठा जागतिक यक्ष प्रश्न आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यान हा त्यावर शोधलेला उपाय आहे. वेगवेगळ्या देशातील तसेच शहरातील अभ्यांगत येथे केलेले प्रयत्न व त्याचे परिणाम पाहण्यासाठी येतात. येथे केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहण्यासाठी भेट देणारे प्रत्येक मान्यवर, अभ्यांगत त्याचप्रमाणे जगातील वैज्ञानिकांनी उद्यानाची प्रशंसा केली आहे.
निसर्गाबद्दल जागरूकता आणणाऱ्या कार्यक्रम तसेच उपक्रमांचा उद्यानाला भेट देणाऱ्या अभ्यांगतांना फायदा होतो. उद्यानातील कार्यक्रमांमुळे जसे की निसर्ग फेरी, कार्यशाळा, परिसंवाद तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे अभ्यांगतांना निसर्ग रक्षणाचे महत्व कळते. उद्यानाच्या उत्साह व नाविन्यपूर्ण दृष्टीकोनामुळे लोकांच्या निसर्गाच्या ज्ञानाचे क्षितीज वाढत आहे व त्यामुळे लोकांना निसर्गाची गुंतागुंत समजण्यास मदत होत आहे.
आता हे उद्यान मुंबईच्या“उद्याच्या चांगल्या हवामानाच्या आशेचे” चिन्ह बनला आहे.
महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची ध्येय :
उद्यानाचा विषय
सन १९९० मध्ये उद्यानाचा विषय ठरवण्यात आला:
“पृथ्वी जीवनजालाने व्यापून गेलेली आहे.
आपण त्या जालाचे घटकमात्र आहोत.”
उद्यानाची उद्दिष्ट:
- मुंबईतील नागरिकांना हिरवी वने व प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देणे.
- नागरिकांमध्ये विशेषतः विद्यार्थी व युवक वर्गांमध्ये, निसर्ग व पर्यावरणाशी संबंधित प्रशिक्षण व जागृती निर्माण करणे.
महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था
मुंमप्रवि प्राधिकरणाने उद्यानाचे व्यवस्थापन व देखभाल करण्यासाठी, संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेची १९९२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि १३ नियामक मंडळाच्या सदस्यांसह नोंदणी करून स्थापना केली.