निसर्गाचे संवर्धन, शिक्षण व त्या विषयीची जनजागृती ह्यामध्ये उद्यान नेहमीच अग्रेसर असतो. तसेच भेट देणाऱ्या निसर्गप्रेमींना निसर्गाचे शिक्षण देण्यासाठी उद्यानात वेगवेगळे शैक्षणिक विभाग आहेत.
  • फुलपाखरू विभाग : फुलपाखरांना असलेल्या रंगेबिरंगांमुळे लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत आकर्षणाच विषय बनले आहेत. ह्या विभागात विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करता येतो. फुलपाखरे मध गोळा करण्यासाठी कोणत्या फुलांवर बसतात, परागीकरण कसे होते तसेच त्यांच्यामध्ये असलेले छदमवेष आणि एक प्रजातीच्या फुलपाखरासारखी दिसण्याची केलेली नक्कल असे बरेच काही येथे शिकायला मिळत.मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात फुलपाखरांची बाग तयार करून महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने फुलपाखरांचे संरक्षण करण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे. सध्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात एकूण ८५ प्रकारची फुलपाखरे बघायला मिळतात.

  • नक्षत्र वन : ज्या वृक्षाची आराधना/पूजा केली जाते तो आराध्यवृक्ष होय. भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार,प्रत्येक वृक्ष हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात औषधीच आहे. विशीष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशीष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी.हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीहि तोडु नये. याच तत्वावर, भारतात जागोजागी नक्षत्र उद्यान निर्माण होत आहेत.

  • पावसाळी पाणी साठवणूक : उद्यानातील झाडांना पावसाळा ऋतू संपल्यानंतर हिवाळा व उन्हाळा या कोरड्याच्या महिन्यांमध्ये सरासरी ४५,००० हजार ते १ लाख लिटर पाणी हे शिंपणासाठी आवश्यक असते. निसर्ग उद्यान मुख्यतः महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असते. परंतु सिंचनासाठी उद्यानात पावसाळी पाणी साठवणूक प्रकल्प तयार करण्यात आला आहे आणि त्यामुळे जवळजवळ २.५ कोटी लिटर एवढ्या पावसाळी पाण्याची साठवणूक उद्यानात केली जाते, त्यामुळे सिंचनासाठी उद्यान आत्मनिर्भर आहे.उद्यानात दोन प्रकारे पाणी साठवणूक केली जाते एक म्हणजे शैक्षणिक इमारतीच्या छतावरून आणि दुसरे म्हणजे उद्यानामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी चर बनविण्यात आले आहेत. त्यामधून एका तलावात हे पाणी साठविले जाते. आता हे प्रकल्प भेट देणाऱ्या अभ्यांगतांना पावसाळी पाणी साठवणूक कशी करावी याची माहिती आणि प्रात्याक्षिक देण्यासाठीचे उत्तम उदाहरण बनले आहे.

  • वृक्षाच्छादित विभाग : या विभागातपर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता टिकवण्यासाठी असलेली झाडांची भूमिका याची कल्पना येते. हा विभाग सर्वात मोठा विभाग असून येथे वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष, झुडुपे, वेली, गवत आणि वानस पहावयास मिळतात.

  • फळझाडे विभाग : आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश असतो. अश्या फळझाडांची ह्या विभागात लागवड करण्यात आली असून त्यांची माहिती अभ्यांगताना ह्या विभागात दिली जाते.

  • कल्पवृक्ष/ताडीच्या जातीच्या झाडांचे विभाग : ह्या विभागात ११ प्रकारच्या ताडीच्या जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

  • औषधी वनस्पती विभाग : प्रत्येक झाडाला काहींना काही औषधी गुणधर्म हे असतातच. पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक व उनानी इ. औषधी पद्धती प्रचलित होत्या. त्यामध्ये वनस्पतींचा वापर करून औषधे बनविली जात. अशीच काही वनस्पतींची ह्या विभागात लागवड करण्यात आली असून त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती ह्या विभागात दिली जाते.

  • रोपवाटिका विभाग : विविध औषधी आणि जंगली वनस्पतींना मागणी असल्यामुळे उद्यानामध्ये एक रोपवाटिका देखील आहे. येथे रोपे विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच ह्या विभागात बीजप्रक्रिया, बीज संगोपन, बियांची उगवण प्रक्रिया आणि रोपवाटिकेचे व्यवस्थापन याबद्दल माहिती या विभागात दिली जाते.

  • गांडूळखत विभाग : अगदी प्राचीन काळापासून सेंद्रिय शेती प्रचलित असून पिढ्यानपिढ्या ह्या पर्यावरण पूरक शेतीचा वापर केला जात आहे. सेंद्रिय खतांमध्ये बरेच प्रकार आहे. त्यातील एक म्हणजे गांडूळ खत. उद्यानात गांडूळखत प्रकल्प उभे करण्यात आले असून त्यामध्ये उद्यानातील पालापाचोळा गोळा करून त्याचा वापर गांडूळखत निर्मितीसाठी कसा केला जातो यांचे प्रात्यक्षिक या विभागात दिले जाते.

  • सुगंधीत व मसाले वनस्पती : आपल्या आहारात वापरात असलेल्या मसाले ज्या वनस्पतींपासून बनविले जाते त्यांची लागवड या विभागात केली आहे. तसेच, सौंदर्य प्रसाधन, अत्तर इ. बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुगंधी वनस्पती या विभागात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.