महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची भूमी म्हणजे मुंबई शहराची एकेकाळची क्षेपण भूमी. त्यावर विविध प्रकारच्या सरीसृपांचे वास्तव्य आधी पासूनच होते. क्षेपण भूमीवरील उंदीर हे ह्या सापांचे खाद्य होते. ह्या क्षेपण भूमीवर लावण्यांत आलेल्या झाडांच्या वाढी बरोबरच हे मानव निर्मित वन वाढू लागले व ह्या सर्व सरिसृपांना जगण्यासाठीचा आधार मिळाला. आसपासच्या तिवरांच्या जंगलातील काही सरिसृप इथे आश्रयाला आले तसेच शहरातून पकडण्यांत आलेल्या काही सापांना इथे पुनर्वासीत करण्यात आले. अन्नाची व निवाऱ्याची उपलब्धता प्राप्त झाल्याने अशा सर्वच प्रकारच्या सरीसृपांनी आता इथे आपले चांगलेच बस्तान बसवले आहे.

किटक, पाली, सरडे, बेडूक, उंदीर व छोटे पक्षी हे ह्या सर्व सरीसृपांचे खाद्य. निसर्ग उद्यानातील अन्न साखळ्यांमध्ये हे सर्व घटक सापडत असल्याने सरीसृप निसर्ग उद्यानाच्या अन्न साखळ्यांमध्ये व्यवस्थितपणे सामावले गेले आहेत. सरीसृपहे शीत रक्ताचे प्राणी असल्याने थंडीच्या दिवसात ते खडकांसारख्या जागी ऊन शेकताना दिसतात. धामण, घोणस, पाण दिवड, नानेटी तसेच विविध प्रकारचे सरडे व पाली हे सहज दिसणारे सरिसृप. भारतात आढळणाऱ्या चार विषारी सापांपैकी नाग व घोणस ह्या विषारी प्रकारच्या सापांचा उद्यानात अधिवास आहे.

निसर्ग उद्यानातील वर्षा  पावसाळी पाणी साठवणूक तलावाचा परिसर हे उभयचरांच्या निरीक्षणाचे उत्तम स्थळ. निसर्ग उद्यान येथे आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सरीसृपांच्या व उभयचरांच्या निरीक्षणासाठीचे उत्तम स्थळ आहे.